ग्रामीण वार्ताजिल्हाप्रशासकीय

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासक कार्यकाळात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार

महेंद्र महाजन, ता.प्र. रिसोड

कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये प्रशासक कार्यकाळात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार

चौकशी अहवालातून स्पष्ट

सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश

रिसोड बाजार समितीतील प्रकार

महेंद्र महाजन

रिसोड: येथील बाजार समितीत प्रशासक कार्यकाळात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे चौकशी अहवालातून निदर्शनात आले आहे. विषेश लेखापरीक्षक वर्ग २ ( फिरते पथक ) सहकारी संस्था अकोला यांच्या चौकशी अहवालातून सदर माहिती पुढे आली आहे. या बाबत सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधक अमरावती यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांना दिले आहेत.
रिसोड कृषि उत्पन्न बाजार समिती अलीकडच्या काळात या ना त्या कारणाने जनसमांन्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यातील मतभेद अनेक वेळा चव्हाट्यावर आले आहेत. अशातच तालुक्यातील रिठद येथील विठ्ठल आरू यांनी प्रशासक कार्यकाळात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार दि.८/६/२०२३ रोजी प्रशासनातील वरिष्ठांकडे केली होती. सदर प्रकरण चौकशीसाठी श्री. आर. एम. जोशी विशेष लेखा परिक्षक सहकारी संस्था अकोला यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. तद्वतच मोप येथील श्री. रामेश्वर नरवाडे यांनी देखील उपरोक्त विषया बाबत तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने विशेष लेखा परिक्षक यांनी सदर तक्रारीची पडताळणी करुन चौकशी अहवाल सादर केली आहे. त्याचे अवलोकन केले असता, नियमबाह्य अनेक बाबी भ्रष्टाचार झाला असल्याचे अधोरेखित करणाऱ्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अनेक बाबींचे खर्च निविदा न मागवता करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बहुतांश बाबी अधिकार क्षेत्राबाहेरील असूनही मंजूर केल्या असल्याचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रशासक हे शासकीय अधिकारी असल्याने त्यांच्याकडून नियम, कायदा, आणि परिपत्रकिय सूचनांचे उल्लंघन होणे अपेक्षित नसते. परंतू ते झाले असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे चौकशी अधिकारी यांच्या चौकशी अहवालातील निष्कर्ष आपण पडताळून आवश्यक कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीची प्रत तक्रारदारास देऊन विभागीय सहनिबंधक कार्यालय अमरावती यांना अवगत करावे असे निर्देश विभागीय सहनिबंधक श्री. विनायक काहाळकर यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशिम यांना दिले आहेत.

भ्रष्टाचार उघड होण्याच्या चर्चेला उधाण
संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर सार्वत्रिक निवडणुक होईपर्यंत येथील बाजार समितीवर प्रशासक मंडळाची नेमणूक करण्यात आली होती. नियमानुसार सदर प्रशासक मंडळास कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसतो. प्रशासक मंडळ हे केवळ निवडणूक होईपर्यंत समितीचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी नेमल्या जात असते. मात्र येथील प्रशासक आणि तत्कालीन सचिवांनी अनेक नियमबाह्य धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचे तक्रारदार यांच्या निदर्शनात आल्यामुळे त्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने सदर प्रकरण चौकशी अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना प्राप्त झाला आहे. सदर चौकशीत अनेक मुद्दे भ्रष्टाचार झाल्याचे अधोरेखित करणारे आहेत.त्यामुळे बाजार समितीत आजतागायत मोठ्याप्रमानात झालेले भ्रष्टाचार आता उघड होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

आजी माजीचे धाबे दणाणले
बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे अनेक आजी माजी सभापती,उपसभापती, व काही संचालक यांच्यासह तत्कालीन सचिवांचे सुद्धा धाबे दणाणले असल्याची चर्चा बाजार समितीच्या गोटात चांगलीच रंगली आहे. मात्र अस्वस्थ व गोंधळलेल्या कारभारात शेतकऱ्यांची परवड जी पहिले होती ती आजही कायम आहे.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल