क्राईम

तिघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा:

अकोट सत्र न्यायालयाचा निकाल

अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच सुनावली तिघांना मृत्युदंडची शिक्षा ; शेतीच्या हिस्सेवाटणी वरून घडले हत्याकांड

अकोला: हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम मालपुरा येथे सन 2015 मध्ये शेतीच्या वादातून वरुन हत्याकांड घडले होते. बहीण व भावामध्ये हिस्से वाटणी वरून झालेल्या या वादात चौघांचा जीव गेला होता. या प्रकरणी आज शुक्रवार 17 मे रोजी अकोट न्यायलयाने तिघांना मृत्युदंड म्हणजेच फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर यातील चौथा आरोपी हा अल्पवयीन आहे. अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच आरोपींना मृत्युदंडची शिक्षा सुनावण्यात आली आहे, हे येथे उलेखानिय आहे.

अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी सत्र खटला क्र. 57/2015, पोलीस स्टेशन हिवरखेड, अपराध क्र. 63/2015 मधील आरोपी हरिभाऊ राजाराम तेलगोटे वय 55 वर्ष, द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे वय 50 वर्ष, श्याम उर्फ कुंदन हरिभाऊ तेलगोटे वय 24 वर्ष, (सर्व रा. राहुल नगर, अकोट ता. अकोट जि. अकोला) या आरोपींविरूध्द खूनाचा गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीला कलम 302, 506 सहकलम 34 भादंवि नुसार शिक्षा सुनावली.

भादंवि 302 सह 34 या कलमा अंतर्गत शिक्षा पात्र गुन्हा करीता तिन्ही आरोपी यांना मृत्युदंडाची म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा व प्रत्येकी रूपये 50 हजार (पन्नास हजार फक्त) रकमेच्या द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. आरोपींनी द्रव्यदंड न भरल्यास आरोपींना 5 वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

भादंविच्या 506 (भाग 2) सह 34 या कलमा अंतर्गत शिक्षा गुन्हयाकरीता तिन्ही आरोपींना प्रत्येकी 7 वर्षाच्या सश्रम कारावासाची व प्रत्येकी रूपये दहा हजार रूपये अशा द्रव्यदंडाच्या शिक्षेची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीने दंड न भरल्यास आरोपींना 1 वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा त्यांनी सयुक्तपणे म्हणजे एकत्रीत रित्या भोगावयाच्या आहेत. मात्र द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. यातील चारही मयताच्या कायदेशीर वारसास त्यांच्यावर अवलंबून असना-या बळीत नुकसान भरपाई योजने अंतर्गत आर्थिक वा अन्य सहायासाठी शासनाच्या संबंधीत विभागाकडे सर्व पुर्तता करून प्रस्ताव पाठविण्यासाठी या न्यायनिर्णयाची प्रत सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला यास पाठविण्यात यावी. असा आदेश पारीत केला.

*प्रकरणाची थोडक्यात हकिकत*
ही घटना 28 जून 2015 रोजी ग्राम मालपुरा या ठिकाणी घडली होती. या प्रकरणामध्ये फिर्यादी यश बाबुराव चऱ्हाटे (मृतकाचा मुलगा) याने पोलीस स्टेशन हिवरखेड या ठिकाणी तक्रार दाखल केली की, त्याचे व त्याचे काका मृतक धनराज याचे शेत मालपुरा गावाजवळ आहे. त्याची आत्या द्वारकावाई हिने वारसा हक्काप्रमाणे त्याचेकडे शेतीचा हिस्सा मागीतला व त्यांनी न दिल्याने ‘दिवाणी न्यायालय तेल्हारा येथे दिवाणी दावा दाखल केला’. तो दावा न्यायालयात प्रलचित असतांना घटनेच्या एक महिन्या अगोदर द्वारकाबाई हिने मृतक धनराज आणि बाबूराव यांचे शेताचे मध्यभागी 2 एकर जमीनीवर सरकी (पराटी) बियाची लागवण केली. त्यावर फिर्यादीचे वडील व काका यांनी पुन्हा पेरणी केली. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. 28 जून 2015 रोजी दुपारी 3 वाजताचे दरम्यान आरोपी द्वारकाबाई ही वादग्रस्त शेतात सरकी (पराटी) बिया लावीत असतांना त्या ठिकाणी तिचा भाऊ मृतक धनराज व त्याचे 2 मुले शुभम आणि गौरव यांचा शेत पेरल्यावरून वाद झाला. त्यानंतर ते सर्व गावात आले. गावात आल्यानंतर द्वारकाबाई हिने तिचा मुलगा श्याम यास फोन करून मालपुरा येथे बोलाविले. व त्यानुसार हरीभाऊ व त्यांचा मुलगा श्याम आणि दुसरा मुलगा, (बाल आरोपी) हे तिघे मालपुरा गावात आले. त्याठिकाणी द्वारकाबाई हजर होती. त्यावेळी चौघांनी संगनमत करून वाद करून मृतक धनराज सुखदेव चऱ्हाटे, शुभम धनराज चऱ्हाटे, गौरव धनराज चऱ्हाटे व बाबुराव सुखदेव चऱ्हाटे या चौघांना घातक धारधार शस्त्राने गंभीर जखमी करून जागीच जीवानीशी ठार मारले. गुन्हयाचा तपासादरम्यान आरोपीतांनी चारही मृतक यांना शेतीचे हिस्स्याच्या कारणावरून जिवे मारल्याचे साक्ष पुराव्यानिशी तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणामध्ये आरोपीतांविरूध्द तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक भाष्कर तवर यांनी तपास केला. नंतर या प्रकरणात हेमंत चौधरी यांनी उर्वरीत तपास करून आरोपीविरूध्द दोषारोपत्र न्यायालयात समोर दाखल केले. आरोपपत्राची दखल घेवून जिल्हा सत्र न्यायाधीश अकोट यांनी आरोपींविरूध्द कलम 302, 323, 506 सहकलम 34 भादंवि प्रमाणे दोषारोपण केले.

*21 साक्षीदाराच्या साक्षी*
या गुन्हयाचे सिध्दतेकरीता सरकार पक्षाच्या वतीने न्यायालय समक्ष एकुण 21 साक्षीदाराच्या साक्षी सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी नोंदविल्या. या प्रकरणामध्ये डॉक्टर, नोडल ऑफिसर,सी.ए. रिपोर्ट तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी फार महत्वाच्या ठरल्या. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने युक्तीवाद करतांना आरोपींनी केलेले कृत्य अत्यंत गंभीर व कूर असल्याने प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे सरकारी वकील जी.एल. इंगोले यांनी युक्तीवाद करतांना न्यायालया समक्ष विषद केले. आरोपीला न्यायालयाने दोषी धरल्यानंतर शिक्षेवरील युक्तीवादा करीता 03 मे 2024 ही तारीख नेमली होती. त्या दिवशी युक्तीवाद करतांना आरोपींना फाशीच्या शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली होती. त्या तारखेस शिक्षेबाबत युक्तीवाद ऐकून सदरचे प्रकरण आज रोजी शिक्षेच्या घोषणेकरीता नेमले होते.
प्रकरणामध्ये विद्यमान न्यायालयाने आरोपींना आज रोजी मृत्युदंडची शिक्षा सुनावली आहे. प्रकरण न्यायालया समक्ष चालत असतांना पैरवी म्हणून विजय सोळंके (पोलीस स्टेशन हिवरखेड) यांनी मदत केली.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल