शैक्षणिकसामाजिक

चिरांगन वऱ्हाडी दिवाळी अंकाचा बोलबाला

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक ज्ञानेश्वर मीरगे यांनी केलेले रसग्रहण

 

समीक्षण. चिरांगन…अस्सल वर्हाडीचा गोडवा.
………………………
अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला द्वारा संपादित, दिवाळी अंक चिरांगनचे नुकतेच प्रकाशन झाले .04थ्या अ. भा. वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ,संत साहित्य अभ्यासक, डॉ.राजेश मिरगे अमरावती यांचे हस्ते,आणि म.रा.साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य श्री. पुष्पराजजी गावंडे यांच्या उपस्थितीत मान्यवर कवी, लेखकांच्या साक्षीने उद्घाटन संपन्न झाले. संतनगरीतील वराडी साहित्यिकांची आणि मायबोलीवर स्नेह करणाऱ्या उपासकांची भरगच्च उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. बार्शीटाकळीचे श्री श्याम भाऊ ठक साहित्य व बोलीभाषा संवर्धन संस्थेच्या माध्यमातून मायबोलीच्या वर्धिष्णुततेसाठी सातत्याने प्रयत्न करीतआहेत. खूप मोठा वराडी मायबोली कवी लेखकांचा गोतावळा त्यांनी निर्माण केला आहे .अनेकांना बोली भाषेत लेखनाकरता प्रवृत्त केले आहे. चिरागंनचे यापूर्वी 05 दिवाळी अंक निघाले आहेत. तोच थाट ,तोच बाज ह्या सहाव्या दिवाळी अंक चिरांगन 2023 च्या वाचनातून प्रत्ययास आला. कृषी संस्कृतीची सारी वयख, बैलांच्या भरोशावर पोसल्या गेली. त्याचा सन्मान चिरांगनने मुखपृष्ठावर मनापासून केला आहे. खिल्लारी जोडी समवेत असलेले शेगावचे रतन बगे, त्यांच्या सहधर्मचारणी सौ.प्रतिभा बगे यांचे सुंदर छायाचित्र मुखपृष्ठावर विलसत आहे.

 

कास्तकारांच्या जिव्हाळ्याचा सण पोळा .ज्याच्यासाठी साजरा करतात त्या बैलांचेकौतुक शेतकरी राजाला निश्चित आहे. हास्य कवी नीतीन वरणकार एका काव्यात लिहितात ,माझा जन्म होताच ,हरीक साऱ्या घराले . गोरा झाला, गोरा झाला ,सोनार्या गाईले.
चिरांगणच्या ह्या अंकात एकूण 19 वराडी बोली भाषेच्या कथा आहेत ..उत्कृष्ट 38 वराडी कवितेचा हा अंक एकूण 108 पृष्ठाचा सुबक आणि साजेसा झाला आहे. प्रचलित आर्थिक धकाधकीच्या काळात ,दिवाळी अंक काढणे अत्यंत जिकीरीचे असे कार्य झाले आहे .तरीसुद्धा वराडी बोलीवर मनापासून प्रेम करणाऱ्या मंडळीच्या, यथाशक्ती योगदानाने वऱ्हाडी बोलीभाषाआमची सगळ्यांची माय आहे ,तीच आपल्यावर माया करते .आपणही वऱ्हाडीला थोडा जीव लावावा ही विनंती करताच, चांगला सहयोग मिळाल्याचे संपादकीय मनोगतात श्रीपुष्पराजजी गावंडे यांनी स्पष्ट केले आहे. पुष्पराजजी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे सदस्य असल्याने ,त्यांची वराडी भाषेवरील कृपादृष्टी नोंद घेण्यासारखी आहे. फार्मसी क्षेत्रात कार्यरत बोलीभाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री श्याम भाऊ ठक म्हणजे प्रसन्न व्यक्तिमत्व. वेळात वेळ काढून, त्यांची बोलीभाषा संवर्धनासाठी चालू असलेली धडपड अतिशय स्पृहणीय अशीच आहे . चिरांगन मधील एकूण 19 कथा ह्या रंजक आणि वैविध्यपूर्ण आहेत. त्यातील काही कथा तर प्रेरणादायी अशाच आहेत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे मसाला किंग विदर्भ सुपुत्र डॉ. धनंजय दातार यांचे परदेशी वारीतील अनुभव खूपच रोचक आहेत. दि. 26 फेब्रुवारी 1984 ला दुबईला उद्योगाच्या निमित्ताने केलेले धनंजय दातार.. आज 40 वर्षाच्या अविरत परिश्रमातून जागतिक स्तरावर मोठे उद्योजक गणले गेले आहेत . त्यांच्या वाटचालीचा प्रत्येक वराडी माणसाला सार्थअभिमान असून त्यांनी दिलेली अनुभूतीतील काही उदाहरणे वाचकांना निश्चित प्रेरित करतात . वाटचालीतील कार्य संदेशाचे लेखातून ते एका वाक्यात सार व्यक्त करतात.. केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार. शास्त्र ग्रंथ विलोकून, मनुजा चातुर्य येत असे फार. डॉ.धनंजय दातारांचे वऱ्हाडी बोलीभाषा प्रेम स्तुत्य असेच आहे. लेखक अरुण विघ्ने यांनी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ जीवनदर्शन लेखातून घडविले आहे . सिंधुताईचा आश्रम ,अजूनही माया देते. पाखराच्या भुकेचं ,राशन केले. नागपूरच्या हर्षा वाघमारे यांची,.. माया साईच लगीन ,ते थेट डिलिव्हरी …ही विनोदी कथा प्रत्यक्ष वाचल्याशिवाय ,त्यातील शब्द लालीत्य ,त्यांची रंजकता अनुभूतीत येणार नाही. गण्याण बायको झोडपली..अकोला येथील डॉ. लता थोरात यांचीही विनोदी कथा भन्नाट अशीच आहे. नागो मामाचं लगीन.. श्री उगले यांनी या कथेत खूपच वास्तव प्रसंग शब्दातून उभे केले आहे. श्री. उगले लिहितात. कोणाच्या नच आवरल्या नाही जाणाऱ्या जावयाला, आपल्या लक्ष्मीने किती पटकन शांत केलं, याचा नागो मामाने हरिक झाला. नागोमामाची लय दिवसाची भेट नव्हती .अचानक नागो मामा आणि मामी काल शेगावच्या स्टेशनवर भेटले .या जोडप्या पासून एक शिकलो.. शेवटी संसारात समजदारी दाखवूनच, जगण्यात खरी मजा आहे. चिरांगनच्या 2022च्या मुखपृष्ठावर झळकलेल्या, प्राथमिक शिक्षिका सौ. साधना काळपांडे अकोला यांची, ठसन ही कथा तर वाचनात खूपच गोडी निर्माण करणारी आहे .वऱ्हाडी अस्सल म्हणींचा गोडवा ह्या कथेत ठासून भरला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य समीक्षण मंडळात, प्रसिद्ध कवी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ सर यांचे समवेत, राज्यस्तरीय समिती सदस्य म्हणून कार्य करण्याचा योग माझ्या जीवनी आला होता . त्यांच्या विचार सहवासात असंख्य वऱ्हाडी बोलीभाषा म्हणी मी ऐकल्या. त्या म्हणींचा पुनर आनंद.. ठसन..वाचल्यावर .या कथेतून घेता आला. कथेतील प्रसंग मांडणी नुसार अशा म्हणी लेखिकेने खूपच सुंदर गुंफिल्या आहेत.
बदबद आलं की सारा सत्यानास करते . पराटीले बद बद बोंड्या लागू दे.माय माय लयच वच वांगे धंदे करून राहिली व . पोराचे लाळ आणि सुनेले गड्डयात गाळ, असा आहे तुमचं. इकळली ना तिकळली अन वांग्या सारखी उकळली . मानान न खाय रोटी, अन निजल्याने उखय चाटी. आणि वराडी भाषेतील रंजक शब्दातील शिव्या.. चोपळी गोंदन, पिसायल कुत्रा,बुटल्या,हेंबाळ्या,हिजड्या, हिंड गोळ्या वानाच्या, सळेल तोंडाच्या, वराडीतील ही शब्दसंपदाच हे या कथेचे वैशिष्ट्य जाणवते. शामराव वच्छीचे शाब्दिक भांडण, त्या प्रसंगाचे शब्द दर्शन तर भन्नाट असेच. माल्यावर करसान ठसन,त खाऊ घालीन फक्त बेसन.. निरा करत रायता, आल्यावर ठसून ..उशीर होत आहे स्वयपाकाले, ऐवढा शिलून द्या लसन.या संवादातून शेवटी लेखिकेने पती-पत्नीचा समन्वय कथेत घडविला आहे. प्रा मोहन काळे यांची सपन, श्रीराम वाघांची वांझोटा, डॉ. विवेक कानडेची ऋणानुबंध , सचिन वाकोडे यांची सोयरीक, वर्षां दांडगे यांची सावतर ही कथा वाचनीय असून, त्यातील वराडी गोडवा अलगच आहे. साहित्यिक आबासाहेब कडू यांची संसार गाळा ही कथाही बोलीभाषेचे एक सुंदर रूप चिरांगण मध्ये दिसून आले.
श्रीश्याम ठक बोली भाषेचे निष्ठावंत उपासक .त्यांची पाठ्यपुस्तक शब्द गंध भाग एक मधील समाविष्ट.. बाप वावर पेरते ही बोली भाषेतील सुंदर कविता मल पृष्ठावर दिली आहे. पाई पाई जमवून, बाप वावरपेरते काया काया मातीतून, दाना दाना अंकुरते . हास्य कवी नितीन वरणकार यांची, ही 11 कडव्यांची दीर्घ कविता शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाचा आलेख स्पष्ट करणारी आहे .चंद्रावर यान पाठवलं तसंच मायबाप सरकारने शेतीचे वास्तव समजून घेण्यासाठी आमच्या वावरातही यान पाठवावे, अशी विनंती कवी करतात .ते म्हणतात. साहेब चंद्रावर पाठवलं तसं, माल्या वावरात पाठवा यान अभ्यास होईल वावराचा, आमचा सारा मिटून जाईल तान. कापसाच्या वावराचा यानाले, मस्त फोटो काढायले लावा कास्तकाराचे छिद्राचं बनियन, तुम्हाला दिसून जाईल बावा. विमल या गुटखा पुडीचे दुष्परिणाम ..आपल्या वेगळ्या शब्दात व्यक्त केले आहेत चांदूर बिस्वा येथील कवी फहिम अख्तर सर यांनी. शेतकरी बाप मध्ये, जयश्री गीतेंची व्यथा ही डोळ्यात पाणी आणते. माया शेतकरी बाप, दोन एकराचा धनी.जगावं की मराव, हा विचार चाले मनी. सुनील पखालेंची सपन पेरतो, ऍड. निवेदिता राजुस्करांची माह्या बाप आणि कवी निलेश कवडे यांची, रोखठोक. संत डेबुजीचा संदेश विषद केला आहे . लग्नाला येल पोरायचं दुखणं.. कवी रामराव पाटेखेडे मलकापूर यांनी खूपच छान वर्णिलेले आहे. सुनो चंपा,सुनो तारा.. या हिंदी गीत चालीवर ,त्यांनी ही कविता खूपच गेयतात पूर्ण केली आहे. मंदा खंडारे यांचे अभंग. …भक्तांचा कैवारी, विठू माझा हरी आली तुझं दारी पांडुरंगा. लाभता दर्शन,आनंद आगळा सुखाचा सोहळा अंतरंगी. जळगाव जामोद चे जावेद शेख दोस्ता या काव्यात बालपणीची मजेची जाणीव करून देतात. आंबट चिंबट बोर चिंचा, खात येचत वावराईन फिरो. वावरात जाणाऱ्या जम्मातीले , आपणच होतो हिरो. डाब डुबली,ईटीदांडू , लेका अलगच होती मजा. तेच जिंदगी या मोबाईल पाई, आता होत चालली वजा. शेगावचे दीपक सरप यांची ,डे गोपाल मुकुंदेची ,सरण.. विनायक काळेंची इचका इंदन ,अलका देशमुखांची ,रखुमाईची इच्छा ह्या कवितांनी अंकाला वेगळाच आयाम लाभला आहे. अंक सहसंपादकाची धुरा श्री. रवींद्र दळवींनी सांभाळली असून, निर्मितीसाठी मसाला किंग डॉ. धनंजय दातार ,अनुराधाजी धामोडे ,उद्योजक सुगतजी वाघमारे यांचे सहकार्य लाभले आहे . एकंदरीत चिरांगन म्हणजे
वर्हाडी मायबोलीतील एक सुंदर दिवाळी अंक साकारला आहे .
…………………………
डॉ .ज्ञानेश्वर मिरगे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, संत साहित्य अभ्यासक.. शेगाव.
9404553505
………………………….
चिरांगन
प्रकाशक.. वराडी साहित्य, बोलीभाषा संवर्धन संस्था बार्शीटाकळी जिल्हा अकोला
मूल्य..रु.250

,

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल