विशेषसामाजिक

तिवसा तांडा येथे होलिकोत्सवाला सुरुवात

तिवसा (तांडा ) येथे बंजारा होलिकोत्सव उत्साहात सुरु

बार्शीटाकळी:
तालुक्यातील तिवसा( तांडा ) येथे गोर बंजारा समाजातील सर्वांनी एकत्रित येवून होलिकोत्सवाला ,होळी पूजनाने सुरुवात केली. यावेळी तांड्यातील बाल गोपालासह युवक व जेष्ठ मंडळीचा सहभाग होता. वाजतगाजत होळी पूजन करून होळी पेटवण्यात आली. उपस्थित सर्वांनी या नयनरम्य सोहळ्याचा आनंद घेतला.

बंजारा होळी बद्दल !!
आपल्या अनोख्या परंपरेमुळे वेगळी आणि रंजक वाटणाऱ्या बंजारा होळीची लोकप्रियता आधुनिक काळातही कायम आहे. कधी काळी तांड्या वस्तीवर गुजराण करणारा बंजारा समाज सध्या आधुनिक प्रवाहात आला आहे. मात्र, आधुनिकता आणि तंत्रज्ञानात सुधारणा झाली असली तरी या समाजातील उत्सव साजरा करण्याची परंपरा आजही कायम आहे. बंजारा समाजाच्या सर्व उत्सवांमध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा सण म्हणजे होळी.
तीन दिवसांपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक दिवशी अनोखी परंपरा पाळली जाते. मुळात सामान्य होळीच्या दुसऱ्या दिवशी बंजारा समाजात होळी पेटवली जाते आणि त्यानंतरच्या दिवशी रंगतो अनोख्या रंगपंचमीचा महोत्सव. हा महोत्सव पाहण्यासाठी बाहेरगावची मंडळी तांडा वस्तीवर प्रचंड गर्दी करतात. नायक (तांड्याचा प्रमुख) आपल्या तांड्यावरील असामींच्या (प्रतिष्ठित पंचमंडळी) सल्ल्यानुसार होळी साजरा करण्या न करण्याचे ठरवतात. त्यांच्या आदेशावरून तांड्यावर होळीची तयारी केली जाते. साधारण महिनाभर आधीपासून तांड्यांवर लेंगीचे (बंजारा लोकगीते) सूर डफड्यांच्या तालावर घुमू लागताे.
दिवसभर काबाडकष्ट करून गावातील लोक सायंकाळी नायकाच्या घरी गोळा होतात आणि प्रतिकात्मक होळीच्या भोवती रिंगण बनवून लेंगी म्हणतात. या लेंगीचा आशय समाज, रुढी परंपरेपासूनच राष्ट्रभक्ती, विकास आदी मुद्यांवर आधारित असतो.

रंगपंचमी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू!
बंजारा होळीच्या रंगपंचमीचे आकर्षण प्रचंड आहे. या दिवशी कुळ आणि आडनावानुसार ठरलेला प्रत्येक तांडा काही खेळांचे आयोजन करत असतो. हारेर लकडा हा यादिवशीचा महत्वाचा खेळ. लोखंडी खांबाला तेल लावून त्याच्या वरच्या टोकाला साखरेच्या गाठ्या आणि बक्षिसाची रक्कम ठेवली जाते. खांबाभोवती गेरणी (बंजारा महिला) झाडाच्या ओल्या फांद्या घेऊन उभ्या राहतात अन त्या खांबावर चढू पाहणाऱ्या गेरियाला झोडपून काढतात. या दिवशी घरोघरी जाऊन फाग (प्रथेनुसार देणगी) मागून मग त्यातून नायकाच्या घरी प्रसाद केला जातो.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल