महाराष्ट्रविशेष

भाविकांचे श्रध्दास्थान बार्शीटाकळीचे श्री खोलेश्वर मंदिर

महाशिवरात्री विशेष

भाविकांचे श्रध्दास्थान बार्शीटाकळीचे श्री खोलेश्वर मंदिर
श्याम ठक
बार्शीटाकळी:
प्राचिन भारताच्या पौराणिक इतिहासाच्या दृष्टीने विचार करून शोध घेतल्यास आपला विदर्भ ज्याला वऱ्हाड म्हटल्या जाते. रुख्मिणीचे माहेर असलेल्या पौराणिक पुण्यभूमित ईतिहास संशोधकांना आव्हान देणारे शिल्प ,समृद्ध किल्ले ,गढ्या ,मानवनिर्मित गुफा ,राजवाडे,स्मारके,स्मृतीस्तंभ हेमाडपंती शिल्पकला असलेली मंदिरे आहेत. त्यातील शिवमंदिराचा मुगुटमणी ठरेल असे शिवमंदिर म्हणजेच अकोला जिल्ह्यातील पौराणिक व ऐतिहासिक नगरी बार्शीटाकळी येथील पुरातन श्री खोलेश्वर शिवालय.
मंदीराचे पूर्व बाजुला उत्तर प्रवाही विद्रूपा नदीचे तिरावर असलेले हे मंदीर हेमाडपंती स्थापत्य शैलीचा अदभुत नमुना आहे. देवगीरीचे सम्राट यादव राजांचा मुख्य प्रधान राहिलेल्या हेमांद्री यांनी बांधलेल्या या वैशिष्ट्यपुर्ण शैलीमुळे ,अशाप्रकारे बांधण्यात आलेल्या मंदिरांचा समावेश हेमाडपंती श्रेणीत केला जातो . यादवांच्या सेनापतीचे नाव खोलेश्वर होते.खोलेश्वर हा यादव नृपतीचा बलाढ्य सेनापती .आपल्या चतुरंग बलाने यादव साम्राज्यांचा मेरुदंड होता. त्यामुळे येथील शिवालयाचे नाव खोलेश्वर असावे असे दिसून येते. तसेच या मंदीरातील शिवलींगाची शाळूंके पासुन विभक्त असलेल्या लींगाची स्वयंभू स्थापना ही स्थानिक भू पातळी जमिन सपाटी पासून २३ फुट खोलवर गर्भ गृहात असल्याने या शिवालयाचे नामकरण खोलेश्वर झाले असावे असाही तर्क वाटतो.
बार्शिटाकळी ही फार पुरातन नगरी असल्याचे इतिहासाची साक्ष आहे. तसेच ब्रिटीश कालीन सरकारी गॅझेट मध्ये सुद्धा नोंद असल्याचे सर्वत्र विधीत आहे. येथे यादव कालीन राजे देवगीरी यांचे राज्य होते. तत्कालीन तटबंदी बारा वेशी असलेल्या या नगरीचे नाव टंकावती असे होते . पुढे त्याचा अपभ्रंश होवून टंकावती नगरास बार्शिटाकळी म्हणू लागले. आणि तेच नाव आता कायम स्वरुपी अद्यापही प्रचलीत आहे. येथील ग्राम देवता असलेले खोलेश्वर शिवालय, प्राचिन कालीन शिल्प समृध्द मंदीर . हे काळ्या दगडांच्या चि-यांनी व अठ्ठाविस दगडी स्तंभाचे विविध व रेखीव शिल्पकलेचे बेजोड नमुने आहेत. विदर्भातील समस्त शिवभक्तांचे, आराध्यदैवतच आहे. मंदीराचे उत्तरमुखी प्रमुख प्रवेशव्दारा समोरच ,हिंदू संस्कृतीचे शुभ प्रतिक असलेली दिपमाळ आहे. प्रवेश व्दारासह मंदीराचा तटबंदी परीसर हा साधारणता ७० x ८० = एकून ५६०० चौरस फुट क्षेत्रफळाचा आहे.

● मंदीराची पंच कलश विशेषता ●
खोलेश्वर शिवालय भव्य स्वरूपाचे असुन ईतर मंदीरा पेक्षा वैशिट्यपूर्ण आहे .मंदीराचे एकूण पाच कळस असुन, पंच कळस हे आध्यात्मिक व हिंदु संस्कृती प्रमाणे त्याचे प्रतिक असे दिसतात.
१) ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. २) आदिनाथ म्हणून ज्याना हिमालया पासून कन्याकुमारी पर्यंत कुणी शिवशंकर, भोलेनाथ, निळकंठ, महादेव, नटराज या पंच नावाने पुज्यनिय आहेत. ३) आत्मा हा पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश या पंचतत्वात विलीन होणारा असतो. ४) भगवान शंकराचे समाधी ध्यान हे काम, क्रोध, मोह, माया व मत्सर या पंच तत्वाशी प्रतिबंधीत आहे. तसेच भगवान शिव म्हणजे पंचानन असेही म्हणतात. आणि हाच हिंदु आध्यात्मिक तत्वाचा विचार पाहता खोलेश्वर मंदीर हे पाच कळसाचे असावे अशी भक्त गणांची श्रध्दा आहे.
● मंदीराची शिल्प समृद्ध बांधणी ●
मंदीरात उत्तरमुखी प्रवेशव्दारातुन तटबंदी परीसरात प्रवेश केल्यास गर्भ गृहाची बांधणी ही
रेखीव, कोरीव नक्षी कामाचे शिल्प असलेल्या १० फुट उंच व १.५ फुट रुंद अशा अतिशय सुंदर सुबक एकूण २८ पायाभूत स्तंभावर केलेली आहे. दगडाची जोडणी प्रत्यक्ष पाहणीत अखंड दिसते. स्तंभावर नागाच्या, यक्ष, पक्षीनीच्या व दक्षांच्या मूर्त्यांचे कोरीव काम केलेले आहे. यक्ष, यक्षीणी हे भक्तांचे उध्दार करणारे असून संकटे दुर करतात.त्यामुळे यादव कालीन मंदीरात याचा समावेश प्रामुख्याने असतो.
शिव मंदीरातील नंदीचे महत्त्व
मंदीरात प्रवेश केल्यावर प्रथमदर्शनी पुर्वमुखी भव्य नंदी दिसून येते . पंच कलशाच्या विशेषतः प्रमाणे पुर्वमुखी नंदी हा ह्या शिवमंदीराला मोठी देण आहे असेही म्हटले तर वावगे ठरू नये.कारण कोणत्याही मंदिरात ,उत्तरेकडील शिवलिंगा समोर नंदी पश्चिममुखी दिसून येतो .परंतु हेमाडपंती यादवकालीन मंदिरात नंदिची बैठक अशी ठेवण्यात आली नाही. हिंदू धर्मामध्ये शिवाचे दर्शन घेण्यापूर्वी नंदीचे दर्शन घेण्याची प्रथा प्रचलित आहे.
मंदीराचे दर्शनी स्थान●
नदी समोरच, पश्चिममुखी भूपातळी पासून २१ फुट शिवलिंगाचे गर्भगृह दर्शनी द्वार आहे. द्वारावर असलेल्या घंटेच्या वर्तुळ स्थानावरील मध्य भागी श्रीकृष्णाची बालमूर्तिचे रेखीव कोरीव काम असून
त्यांचे एकाच शिरावर समान स्वरुपाचे पाच बालकृष्ण दिसतात .ही शिल्प कलाकृती पाहणा-यांना चकीत करणारी आहे. गर्भगृहाच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर ,भगवान खोलेश्वर महादेवाचे चकचकीत काळया पाषाणाची, शाळुंके पासून विभक्त असलेले स्वयंभू शिवलींग भाविकांचे लक्ष वधुन घेते, १० बाय १० चे गर्भ गृहातील शांत व ध्यानमय वातावरण आणि भक्त मुखातुन उच्चारीत ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र घोषाचा प्रतिध्वनी, दर्शनार्थी भाविकांच्या अंतकरणत वास करतो .

  • चौकट
    हिन्दू धर्म संस्कृती प्रमाणे बेल पत्र अर्पित करुन शिवपुजनाचे सार्थक होते. विशेष बाब म्हणजेच या स्वयंभू शिवलिंगातुन अनादि काळापासून बाराही महिने व तिन्ही ऋतुमधे अखंड जलधारा वाहत असते. जल हे गंगा तिर्थ म्हणून भाविकांची श्रध्दा आहे. येथील सनातन पुजारी स्व.ह.भ.प. दत्तोपंत गुरव पोटेकर हे सायंकाळच्या आरती नंतर अर्पित बेल पत्रात मुरलेले नैसर्गीक शुध्द, हस्त व पदस्य नसलेले पवित्र जल तिर्थ, रोगनाशक म्हणून भक्त गणांना सकाळी देत असत. कारण आयुर्वेदात व वैज्ञानिक परीक्षणात ही बाब परिणामकारक अनुभव म्हणून सिध्द झालेली आहे. ही अंधश्रध्दा नव्हे। परंतु सद्यास्थित प्रदुषित, अस्वच्छ परीस्थीतीमुळे ही पध्दत लोप पावल्याचे दिसते.
    एकंदरीत खोलेश्वर शिवालय शिवभक्तांचे पवित्र श्रध्दा स्थान असून मनोकामना पूर्ण करणारे आहे. मंदीरात चैत्र शुध्द प्रतिपदेला यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन असते. तसेच श्रावणी बेल अर्पित लाखोळी महाशिवरात्री उत्सव व वर्षभरात विविध धार्मिकपुजा विधिचे कार्यक्रम सदैव भक्तांच्या सहकार्याने होत असतात. धर्म संस्कृती भाविकांना पौराणिक इतिहास ज्ञात व्हावा म्हणून शिवभक्तांसाठी स्व.ह.भ.प. दत्तोपंत पोटेकर (गुरव) सनातन पुजारी खोलेश्वर मंदीर यांनी तत्कालीन , मौखिक माहिती वरुन आपल्या सेवेत हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
    नरेंद्र दत्तोपंत पोटेकर (गुरव )
    पुजारी,जागेश्वर संस्थान बार्शीटाकळी

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल