आजची सावित्री डॉ. रीना कैलास राठी
आजची सावित्री डॉ. रीना कैलास राठी
नाशिक: ०१ मार्च २०२४
शुक्रवार दिनांक 23/2/2024 ची ती काळ रात्र !
काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र !
नाशिक येथील सुयोग हॉस्पिटल मध्ये नेहमीप्रमाणे पेशंट व नातेवाईक यांची ये जा सुरू होती. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष डॉक्टर कैलास राठी व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रीना राठी हे नेहमीप्रमाणे आपले राऊंड घेत होते .डॉक्टर रीना आपल्या बाल रुग्णांची तपासणी करावयास निघून गेल्या. राउंड संपवून त्या परत डॉक्टर कैलास राठी यांच्या केबिन कडे येत असताना त्यांना ‘ती’ व्यक्ती पळताना दिसली .अरे ही व्यक्ती अशी का पळत असावी एवढा क्षणभर विचार मनात येईपर्यंत मागून कर्मचाऱ्यांचा पकडा ! पकडा त्याला त्याने सरांना मारले ! असा अरडा ओरडा सुरू झाला. हे ऐकताच रीनाच्या डोक्यात त्याने हातापायी केली असेल असेच आले ,परंतु त्यांनी डॉक्टर कैलास यांच्याकडे धाव घेतली. पाहते तर काय ? सगळीकडे जणू रक्ताचा सडा पडला होता तिचा जीवन साथी खाली पडला होता . तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आली ,पण क्षनभरच! पुढच्या क्षणी ही सावित्री यमाशी दोन हात करायला सज्ज झाली. आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रदीर्घ अनुभवाने व समय सूचकतेने तिने सगळे उपचाराचे चक्र फिरवले.हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आपल्या लाडक्या सरांना सावरायला पुढे सरसावला व डॉक्टर रीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले .
परंतु त्या क्रूर ,विकृत व्यक्तीने कोयत्याचे एवढे वार केले होते की रक्त कुठून येत आहे हेच कळेना! डॉक्टर कैलास यांच्या डोक्यावर व मानेवर एवढे जीव घेणे वार केले होते की कुठल्या घावावर प्रथम उपचार करावा असे झाले. परंतु डॉक्टर राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत झालेला स्टाफ व डॉक्टर रीना यांच्या सूचनेनुसार अजिबात वेळ न घालवता उपचार सुरू झाले. एखादा सामान्य व्यक्ती अशा हल्यानंतर कुठलाच नसता पण हे डॉक्टर कैलास राठी, खरोखरच लढवैये व जबरदस्त इच्छाशक्तीचे धनी ! संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना आपल्या पत्नीस काय उपचार द्यावे ही सूचना देत होते! जातीचे डॉक्टर ते !
पतीवर उपचार करताना डोक्यात फक्त त्यांना वाचवण्यासाठी काय काय करावे लागणार हेच विचार चक्र रीना यांच्या डोक्यात सुरू होते व त्या अन्वये त्या स्टाफला बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन सूचना देत होत्या. आपल्या सगळ्या भावना बाजूला जाऊन एक डॉक्टर बनवून त्यांनी एक ना अनेक बाबी लक्षात घेऊन डॉक्टर कैलास यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब हालवण्याचा निर्णय घेतला व आपली समय सूचकता दाखवली . हा हा म्हणता ही वार्ता सगळीकडे पसरली.नातेवाईक ,मीडिया ,राजकारणी, समाजकारणी ,शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, विविध स्तरातील व्यक्ती अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर जमा झाली. डॉक्टर राठी यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध होऊ लागला.
आयसीयू मध्ये अपोलो हॉस्पिटलचे निष्णांत डॉक्टर्स व सुयोग हॉस्पिटलच्या तज्ञांची टीम आपले शर्तीचे प्रयत्न सुरू केले व डॉक्टर राठी यांच्यावर उपचार सुरू झाले .
आता या सावित्रीच्या , रीनाच्या लढाईचा दुसरा पर्व सुरू झाला .कैलास राठी यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले. ती खरोखरच भयानक रात्र होती डॉक्टर रीना यांनी प्रण केला की सकाळचा स्कॅन होईपर्यंत मी पाण्याचा घोट ही घेणार नाही! इकडे राठी कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाची घालमेल काय सांगावी ? घरी त्यांची आई लेकाच्या जीवासाठी देवाला साकडे घालत होती. डॉक्टर राठी यांचे अपत्य वृंदा व राम दोघांना तर धक्क्यातून सावरणे अवघड झाले होते .परंतु आई-वडिलांनी दिलेली सकारात्मक दृष्टी व विचारसरणी त्यांना सांगत होती आमचे वडील यातून हमखास सुखरूप बाहेर पडतील! सकाळी ही वृंदा ,सावित्रीची लेक सहा वाजताच पोहोचली आपल्या आई-वडिलांकडे ! सात वाजता स्कॅन चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर या सुकन्याने आपल्या आईला प्यायला पाणी दिले रात्रभर नाना विचारांचे काहूर मनात असलेल्या व अस्वस्थ मन झालेल्या सगळ्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी ही हिम्मतवान सावित्री उभी राहिली. आपल्या डोळ्यातील अश्रू कुठेतरी आत लपवून, आत्मविश्वासाने भरलेली डॉक्टर रीनाने सगळ्यांना एकच सांगितले बी पॉझिटिव कैलास शंभर टक्के बाहेर पडणारच आहे ,नव्हे त्याला यातून बाहेर पडावेच लागेल . तुम्ही सगळे फक्त देवाचे नामस्मरण करा व विश्वास ठेवा की कैलास सुखरूप आहे ! सुखरूप आपल्यासमोर येतील ! काय हा विश्वास !काय तो देवावर भरोसा! सगळे काही प्रशंसनीय ! चोहो बाजूने देवाचा धावा सुरू झाला . डॉक्टर आपल्या विज्ञानाने व परिवार आपल्या प्रार्थनेने कैलास यांच्यावर उपचार करू लागले. इथे प्रत्ययास आले देव तारी त्याला कोण मारी?
डॉ.कैलास उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते.परंतु हे डॉ कैलास पेशंटच्या भूमिकेत येतच नव्हते.त्यांच्यातला डॉक्टर सजक होता.आपले औषध उपचार ते सजक पणे करून घेत होते.
आय सी यु मध्ये डॉक्टर रीना यांच्या बरोबरीने डॉ.प्राजक्ता ही आपल्या सरांच्या उपचारासाठी डोळ्यात तेल टाकून रात्रीचा दिवस करत होती.डॉ.राठी यांना वाचण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
यातच डॉ.कैलास यांच्या प्रकृती च्या काळजीने त्यांना मुंबई येथे हलवावे असे सांगण्यात येऊ लागले.परंतु, सगळी परिस्थिती पाहता, सगळे निष्णातडॉक्टर वरच्या विश्वासाने डॉ रीना यांनी खूप नम्रपणे हे नाकारले व स्वतःच्या जबाबदारीवर डॉक्टर कैलाश यांचे सर्जरी पुण्य भूमी नाशिक मध्ये डॉक्टर एखंडे व डॉक्टर बिर्ला यांच्याकडून करवायाचे निश्चित केले. त्यांच्या निर्णय क्षमतेला सलाम !
सर्जरी करावयाचे ठरल्यापासून विविध स्तरातील लोकांकडून प्रार्थना होऊ लागली. इथे जात पात, धर्म भेद कुठल्या कुठे पळाला! उगवच्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्यासाठी नमाज आदा केली! बोहरी समाजाकडून त्यांच्यासाठी पवित्र जल आले! हिंदू समाजात विविध धार्मिक विधी सुरू झाल्या ! राठी कुटुंबांनी माणूस कमावल्याची ही साक्ष होती.राठी दाम्पत्यांनी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही.आपल्या परिने ते सर्वांना नेहमीच मदत करत आले त्यांच्या सत्कर्माचा त्यांनी केलेले संचितकर्माचे फळ म्हणजे डॉक्टर कैलास यांचे ऑपरेशन सुखरूप पार पडले .
आजपर्यंत हजारो बालकांना डॉक्टर रिना यांनी व अनेक पीडित रुग्णांना डॉक्टर कैलास यांनी प्राण दान दिले आहे .
ते त्यांचे कर्तव्य जरी असले तरी देवाने त्यांचे प्राण वाचवून त्यांच्या सत्कर्माचे फळ त्यांना दिले . ह्या लढ्यात रिनाला खंबीर पाठिंबा होता तो वसू दीदी,पिटू दीदी,उगाव येथील राठी परिवार, सातपूर चा मुंदडा परिवार मालेगाव चा कलंत्री परिवार व तिचा सर्व मित्र परिवार ज्यांच्या शुभेच्छा मुळे ती ही लढाई जिंकु शकली.र्डॉक्टर रीना राठी या सावित्रीने एका आईसाठी त्यांचा मुलगा, बहिणींसाठी भाऊ व मुलांसाठी वडील ,सुयोग हॉस्पिटलचा कुटुंबप्रमुख व आपले सौभाग्य आपल्या जिद्दीने ,समय सूचकतेने व सकरात्मक विचाराने परत आणले !
व्हेंटिलेटर निघे पर्यंत अन्नाचा दानाही न खाणाऱ्या रीनाला व तिला साथ देणाऱ्या तिच्यासाठी उभ्या असलेल्या तिच्या परिवाराला माझे त्रिवार वंदन!
सौजन्य-रमेश नावंधर, मंगरुळनाथ जि. वाशिम