ताज्या घडामोडीनिवडणूकमहाराष्ट्रराजकीय

मोठी घडामोड: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना घरी येऊन भेटणार?

मोठी घडामोड: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना घरी येऊन भेटणार?

संभाजीनगर: २२ फेब्रुवारी २०२४
अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेले. त्यानंतर जागा वाटपाची बोलणी थांबली. आता बोलणी पुन्हा सुरू होणार म्हणाले ही चांगली गोष्ट आहे. आम्ही आमचा मसुदा दिला आहे. सर्वांचे मसुदे येतील. त्यानंतर सर्वसमावेशक मसुदा तयार होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जेपी नड्डा हे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर मोठं विधान केलं आहे. जेपी नड्डा आले तर मी त्यांना भेटणार, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी थेट नड्डा यांना भेटण्याची तयारी दाखवल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. जेपी नड्डा राजगृहावर येणार की नाही माहीत नाही. मला तसा त्यांच्याकडून कोणताच मेसेज आलेला नाही. ते आले तर कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना भेटणार. मी सगळ्यांनाच भेटणार. जेपी नड्डा आले तर त्यांचा उचित सन्मान करावा, असं मी कुटुंबाला सांगून ठेवलं आहे. राजगृहावर येणाऱ्यांचा आम्ही नेहमी योग्य सन्मान करतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नड्डा आणि आंबेडकर यांची भेट होणार का? झाली तर या भेटीत काय चर्चा होणार? त्यानंतर आंबेडकर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकत्र लढू
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात जागा वाटपाच्या वाटाघाटी झाल्या ही चांगली गोष्ट आहे. तुम्ही 48 जागा घेतल्या आहेत. आम्हाला कोणत्या जागा मिळणार याच्या वाटाघाटी करू. या पुढच्या बैठका लवकर होतील अशी अपेक्षा आहे, असं सांगतानाच आम्ही सर्वजण मिळून एकत्र निवडणुका लढू, असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
भाजप घाबरली
भाजपकडून राजकीय पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे. कारण भाजप घाबरली आहे. भाजप ज्या जागांवर लढत नाहीत तिथे पाहिले पाहिजे. भाजपचा 400 प्लसचा आकडा आम्ही मानत नाही. केंद्रात भाजप आणि संघाची सत्ता येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असंही ते म्हणाले.
सत्तेवर जरांगे यांचा प्रभाव असेल
यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य केलं. सगे सोयऱ्यांचा समावेश झाला नाही. तो का झाला नाही हे सरकारने समजावून सांगितलं पाहिजे. जरांगे यांचे आंदोलन आहे तिथेच आहे, असं सांगतानाच मला वाटतं जरांगे आणि ओबीसी आता आंदोलन सुरू करतील. एवढ्या लवकर हे आंदोलन संपेल असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं. मनोज जरांगे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा लढवावी असं मला वाटतं. पुढे विधानसभा आहे. त्यावेळी जरांगेमुळे चांगले चांगेल नेते भुईसपाट होतील. मनोज जरांगे यांनी विधानसभेत जोर लावला तर राज्यातील सत्तेवर त्यांचा प्रभाव असेल, असंही ते म्हणाले.

सौजन्य: TV9मराठी

ADVT.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल