उत्सवजिल्हाप्रशासकीयमहाराष्ट्रविशेष

निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली

बार्शीटाकळी तालुका वगळता जिल्ह्यात मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमाचा विसर

निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्या आदेशाला केराची टोपली

बार्शीटाकळी तालुका वगळता जिल्ह्यात मराठी भाषा पंधरवडा कार्यक्रमाचा विसर

मराठी भाषा पंधरवडा १४ ते २८ जानेवारी २०२४ पर्यंत साजरा करण्याचे शासनाचे आदेश होते .
अकोला
दि. ३०–
राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने राज्यात १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार होता .. या अनुषंगाने राज्यातील केंद्र सरकार तसेच राज्य शासनाच्या राज्यस्तरीय, विभागीय आणि जिल्हास्तरीय शासकीय आणि अधिनस्त कार्यालयांनी मराठी भाषेसंदर्भातील विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना मराठी भाषा विभागामार्फत करण्यात आली होती .
या कालावधीत सर्व कार्यालयांमधून मराठी भाषेसंबंधी परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिर, कविसंमेलन, नाट्य, घोषवाक्य, अभिवाचन, कथाकथन, पुस्तकांचे रसग्रहण, वादविवाद यांसारख्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. मराठी वाचन संस्कृती वाढावी यादृष्टीने अभिजात ग्रंथांचा परिचय करून देण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देशित होते . याशिवाय मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता विविध माध्यमांतून याबाबतचे दृक श्राव्य संदेश प्रसारित करावेत असेही म्हटले होते . ग्रंथ प्रदर्शन, दिंडी, पुस्तक भेट देणे, पुस्तक जत्रा, समाजमाध्यमांवर मराठी वाचन कट्टा आदी उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे या अनुषंगाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले होते .
मराठी भाषेच्या प्रसार प्रचारासह रोजगाराभिमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी अनुवाद लेखन, व्यावसायिक लेखन, पुस्तक निर्मिती व प्रकाशन प्रक्रिया, स्व-प्रकाशन, ई बुक, ऑनलाईन विक्री, लेखक प्रकाशक करार, संहिता लेखन, लघुपट, माहितीपट लेखन आदी विषयांवरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात याव्यात , अशीही सूचना करण्यात आली होती .
भाषा संचालनालयाने व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेल्या भ्रमणध्वनी उपयोजकाबद्दल (मोबाईल ॲप) तसेच मराठी भाषा विभागाच्या व त्या अंतर्गत कार्यालयांच्या संकेतस्थळांबद्दलची माहिती भाषा पंधरवड्याच्या निमिताने शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल . मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्याबरोबरच महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, मुंबई मराठी साहित्य संघ आदी साहित्य सस्थांची मदत घेता येणार असल्याचे मराठी भाषा विभागाने स्पष्ट केले होते. ईतके सारे निर्देश व उपाययोजना करूनही शासनाच्या अखत्यारीतील अकोला जिल्हा मराठी भाषा विभाग निद्रावस्थेत आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण अकोला जिल्हा मराठी भाषा समीतीच्या वतीने निवासी जिल्हा उपधिकारी विजय पाटील यांनी निगर्मित केलेल्या आदेशाला बहुतांश तहसिलदारांनी केराची टोपली दाखवली असल्याचे ध्यानात येते. कारण बार्शीटाकळी तहसीलदार वगळता अकोला जिल्यातील ईतर कोणत्याही तहसिलदारांनी मराठी भाषा पंधरवडा साजरा केला नाही. जिथे कुंपनच शेत खाते तिथे दाद मागायची तरी कुणाला ? जिल्हा मराठी भाषा समीतीवर असलेल्या अशासकीय सदस्यांना तीन महिन्यात अर्ध्या तासासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावल्या जाते. बळजबरीने केल्यासारखी तिथे मराठी भाषा जतन करण्यासाठी तिच्या प्रचार व प्रसारावर कशीतरी चर्चा केल्या जाते. ह्या बैठकीत उपस्थित असलेल्या अशासकीय मराठी भाषा समीती सदस्यांना विचारात घेतल्या जात नसल्याची खंत ह्या सदस्यांनी बोलून दाखवली. ते असेही म्हणाले की आम्ही मराठी भाषेवर असलेल्या प्रेमापोटी पदरमोड खर्च करून प्रत्येक सभेला उपस्थित असतो. आम्ही मराठी भाषेसाठी सुचविलेल्या विषयांवर पुढे काहीच होत नाही. निवासी उपजिल्हाधिकारी ह्यांनी त्यांच्या सहीचे पत्र काढून त्यांच्यावर असलेली मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याची जबाबदारी पुर्ण केली. त्यांना ह्यातच समाधान वाटले. आपण काढलेल्या पत्रानुसार जिल्ह्यात मराठी भाषा पंधरवडा साजरा केल्या जातो की नाही याबद्दल मागोवा घेण्याची तसदी घ्यावी वाटली नाही. यातूनच त्यांची मराठी बद्दलची आस्था ध्यानात येते. राज्याचा मराठी भाषा विभाग ,मराठी भाषा मंत्रालय,मुख्यमंत्री आणि मराठी भाषे संदर्भात जबाबदारी असलेले विभाग व त्यांचे अधिकारी हे या विषयाकडे गांभीर्यपूर्वक बघतील का ? हा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

चौकट
अकोला जिल्हा मराठी भाषा समितीच्या अशासकीय सदस्यांचे मत विचारात घेतल्या जात नाही.
थातुरमातुर बैठक घेऊन बोळवण केल्या जाते. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी शासनाने निर्देशित केलेल्या आदेशाची पायमल्ली झाली आहे.
सुरेश पाचकवडे
डॉ.विनय दांदळे
श्याम ठक
प्रा.डॉ.मयुर लहाने
अशासकीय सदस्य
अकोला जिल्हा मराठी भाषा समीती

Advt.

 

 

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल