अपघात

पुलावरून मालवाहू ॲपे कोसळून सहा भाविक ठार

मालवाहू ॲपे पुलावरून कोसळून सहा भाविक ठार

नवस फेडण्यासाठी निघाले होते पोहरादेवीला; दोन गंभीर, बेलगव्हाणजवळील घटना

कानोसा प्रतिनिधी दि.१७ जानेवारी २०२४
पुसद तालुक्यातील जवाहरनगर (धुंदी) वरून उमरी (पोहरादेवी) येथे नवस फेडण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या मालवाहू ॲपे वाहनाला पुसद- दिग्रस रोडवरील, बेलगव्हाणजवळ दि.१६ जानेवारी २०२४ मंगळवारी रोजी , सकाळी साडे दहा वाजता भीषण अपघात झाला. हे वाहन पुलावरून कोसळल्याने त्यातील सहा जण ठार झाले. दोन गंभीर जखमी चिमुकल्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ज्योती नागा चव्हाण (वय ६०), उषा विष्णू राठोड (५०), सावित्री गणेश राठोड (६०, सर्व रा. धुंदी), वसराम चव्हाण (६०), लीला वसराम चव्हाण (६५, दोन्ही रा. धानोरा), पार्वता रमेश जाधव (५०, रा. वसंतपूर) यांचा समावेश आहे. प्रथमेश अर्जुन राठोड (वय तीन, रा. पांढुर्णा), राज राहूल चव्हाण (वय ५, रा. टोकी तांडा मोहा) हे दोन चिमुकले गंभीर जखमी असून त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. वाहनातील अन्य आठ प्रवासी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जवाहरनगर धुंदी येथील गणेश लच्छिराम राठोड यांच्या घरी ही सर्व नातेवाईक मंडळी
जमली होती. मंगळवारी सकाळी हे सर्व सोळा जण धुंदी येथील ज्ञानेश्वर गणेश राठोड
यांच्या तीन चाकी मालवाहू ॲपेतून, उमरी पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी निघाले. धुंदीचा घाट ओलांडल्यानंतर बेलगव्हाण जवळील छोट्या पुलावर ,चालकाचे नियंत्रण सुटले व ॲपे नाल्यात कोसळला. त्यात चार जण जागीच ठार झाले. जखमी बारा जणांना रुग्णवाहिकेने पुसद येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

■ मालवाहू ॲपेच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून कोसळल्याने सहाजणांना जीव गमवावा लागला. त्यात चालक ज्ञानेश्वर राठोड (धुंदी ) जखमी झाला. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला व त्याने बाजूलाच असलेल्या झाडाला लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी घटनास्थळावरील लोकांनी त्याला पकडून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेची ग्रामीण पोलीस चौकशी करीत आहे.
उपचारादरम्यान लीला चव्हाण व सावित्री राठोड या दोन महिलांचा मृत्यू झाला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच सुरुवातीला आमदार इंद्रनील नाईक यांनी खासगी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्यांच्यावरील उपचारासाठी योग्य निर्देश दिले व आर्थिक मदत केली. तसेच आ.निलय नाईक यांनी जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले.

चौकट
नवसाचा बोकड्या सुरक्षित
बंजारा समाजाचे उमरी (पोहरादेवी) श्रद्धास्थान असून नवस फेडण्याची परंपरा आहे. यासाठी बोकडाचा बळी दिला जातो, या अपघातात वाहनातील सहा जणांचे बळी गेले. मात्र, बळी देण्यासाठी सोबत घेतलेला बोकड मात्र या अपघातानंतरही सुरक्षित राहिला.

Shyam Thak

आपल्या परिसरातील घडामोडींचा अचूक कानोसा घेऊन,ते बातमीच्या स्वरूपात प्रकाशित केल्या जाते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केल्या जाईल